मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

हनिमून ट्रॅव्हल्स (अनलिमिटेड)

675 दिवस, सहा खंड, 52 देश आणि 302+ ठिकाणं



लग्न झालं की हनिमून आलाच. मग हनिमूनसाठी कुठे जायचं, किती दिवस जायचं, याचे प्लान आणि तयारीही कित्येक महिने आधीच केली जाते. कारण एकच असतं, आपला हनिमून अविस्मरणीय, एक्सायटिंग ठरावा. बरं हा हनिमून असतो तरी किती दिवसांचा? मोजून चार ते आठ दिवसांचा. पंधरा दिवसांच्यावर नाहीच नाही. पण जगाच्या एका कोपर्यात अशी एक जोडी आहे जी, तब्बल 675 दिवसांचा हनिमून साजरा करताहेत.



केनियातील ‘मसाई मारा’मध्ये साहस, धाडस, चित्तथरार यांना मर्यादा नाही. नदीच्या एका काठावरून पलीकडे जाण्यासाठी धडपडणारे हरीण किंवा झेब्र्याचे कळप, पलीकडच्या काठावर शिकारीसाठी त्यांची वाट बघत बसलेला एखादा बिबट्या आणि नदीच्या पात्रात आ वासून आणि दबा धरून बसलेल्या मगरी असं चित्र मारा मध्ये हमखास पहायला मिळत. पण तो प्रसंग आजही अंगाला शहारे आणतो. एका शांत दुपारी झाडीच्या गर्द छायेखाली एक चित्तीण आपल्या पिल्लासोबत पहुडली होती. पण अचानकच तिने झेप घेतली. दूर कुठे शिकार दिसते का ते पाहण्यासाठी ती उंचावर चढली. आम्ही अवाक् होऊन पाहतच राहिलो. खरं तर बघण्यापलिकडे आम्ही काही करूच शकत नव्हतो. कारण ती  ज्या उंच ठिकाणावर चढून सावज शोधत होती, ते ठिकाण म्हणजे आमच्या गाडीच छत! तिच्या हालचाली पाहत अगदी स्तब्धपणे आम्ही गाडीत बसलो होतो. पण मनात एकच विचार डोकावत होता. भक्ष्याच्या शोधात असलेल्या या ‘माते’ची नजर आमच्यावर पडली तर?

न्यूझीलंडमध्ये ऑकलंड ते वेलिंग्टन हा पाच दिवसांचा रस्त्याचा प्रवास करताना आमचा पहिला मुक्काम रोटोरुआ शहरात होता. हा सगळा ज्वालामुखीप्रवण प्रदेश. पॅसिफिक रिंग आफ फायर मधील भौगोलिकदृष्ट्या सर्वात अशांत मानल्या जाणाऱ्या नॉर्थ आईसलंडच्या टौपो क्षेत्रात हा भाग येतो. ज्वालामुखी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो तो, फक्त विध्वंस. हा परिसर मात्र याला अपवाद ठरतो. लाव्हाचे झरे, उकळ्या फुटणारया चिखलातून येणारे बुडबुडे, सप्तरंगी थराने सजलेली डबकी हे सगळ पाहिलं कि आपण भूतलावरल नसून स्वर्गीय दृश्यच अनुभवत असल्याचा भास होतो. तुम्ही फक्त तुमच नाक धरून पुढे पाउल टाकायचं. निसर्गाने समोर मांडलेला देखावा तुमचा श्वास आपोआप रोखून धरतो...

हे दोन्ही चित्तथरारक अनुभव आहेत माईक आणि ऍन हॉवर्ड या दोघा जिप्सींचे. ही दोघंही निघालीत जगाच्या सफरीवर. त्यांच्या या सफरीत आश्चर्य वाटण्यासारखं काय, असं तुम्हाला नक्कीच वाटेल. पण आश्चर्य वाटावं व तोंडात बोटं जावीत, अशी ही सफर नक्कीच आहे. कारण ही दोघंही जग भ्रमंतीच्या माध्यमातून निघालीत आपला हनिमून साजरा करण्यासाठी. म्हणायला हा हनिमूनच पण तब्बल ६७५ दिवस झाले तरी या जोडप्याचा हनिमून संपलेला नाही. एकामागून एक देश ओलांडत, अनेक समुद्र, असंख्य नद्या, हजारो गाव मागे टाकत त्यांची मधुचंद्राची जागतिक सफर अजून सुरु आहे.

माईक आणि ऍन दोघंही अमेरिकन आहेत. माईक आहे पेनसिल्व्हानियाचा तर ऍन हॉलिवूडची. 2006 मध्ये कामानिमित्त त्यांची भेट झाली. मनं जुळली. प्रेम झालं आणि 20011 मध्ये लग्नही झालं. आयुष्याचा हा प्रवास तुमच्या आमच्यासारख्या अनेकांमध्ये बहुतांश सारखाच असेल. अनेकांना तर हनिमूनवरून परतल्यावर पुन्हा भटकंतीला जायचं म्हटलं तरी बराच काळ निघून जातो. कधी नोकर्यांमुळे सवड मिळत नाही तर कधी आर्थिक तडजोड या जादा खर्चाला परवानगी देत नाही. या न त्या अनेक कारणामुळे अस मनसोक्त भटकण राहूनच जात. नेमका हाच विचार या नवदाम्पत्याला एक धाडसी निर्णयावर घेऊन गेला. या जोडप्याने आपलं होतं नव्हतं ते सारं विकल, घर भाड्याने दिल आणि हि दुक्कल निघाली एका अविस्मरणीय ऐतिहासिक हनिमूनला. 

 त्यांच्या हनिमूनची अनलिमिटेड सफर सुरू झाली ती,  22 जानेवारी 2012 पासूनजगातली हनिमून डेस्टिनेशन्स म्हणून प्रसिद्ध असलेली सगळी ठिकाणं पालथी घालायची, त्यांनी ठरवलं. आतापर्यंत त्यांनी सहा खंडांमधील 52 देशांतील 302 हून अधिक ठिकाणांना भेट दिलीय. सध्या ते यु.एसमधील वरमाउँट येथे आहेत. तर गेले दोन महिने ते मेक्सिकोतच तळ ठोकून होते. वरमाउँटची सफर झाल्यानंतर त्यांचा मुक्काम कॅलिफोर्नियात जवळपास तीन आठवड्यांसाठी असणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा लांबलचक प्रवास तुटपुंज्या भाड्यावर कसा शक्य आहे? तुमचं म्हणणंही बरोबर आहे. पण या दोघांच्या डोकॅलिटीला दादच द्यावी लागेल. इथे या दोघांची व्यावसायिक पार्श्वभूमी कामी आली.

ऍन एका मासिकाची संपादक तर माईक सोशल आणि डिजिटल मिडियाशी संबंधित होता. त्यांच्या या हटके हनिमूनला असलेली न्यूज व्हॅल्यू ओळखून त्यांनी आपल्या प्रवासाची वर्णनं, छायाचित्र प्रिंट-इलेक्ट्रानिक माध्यमांना विकण्यास सुरूवात केली. आपल्या प्रवासाची माहिती देणारा हनिट्रेक नावाचा ब्लॉगही त्यांनी सुरू केला. शिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्रागामसारख्या सोशल साईट्सच्या माध्यमातूनही ते लोकांच्या संपर्कात राहिले. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केलीय. त्यात स्वस्त-महागडे लाँजिंग, भटकंती करताना घ्यायची काळजी, आवश्यक असलेले सामान, भटकंती दरम्यान कमीत कमी खर्च व्हावा, यासाठीच्या ट्रिक्स अशा बर्याच गोष्टींचा समावेश आहे.

त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाचं बजेट लो ठेवलं असलं तरी या प्रवासातलं थ्रील, एक्सायटमेंट तीळभरही कमी झालेलं नसल्याचं ऍन आणि माईकचं म्हणणं आहे. आणि त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर त्यांचा अमेझॉन जंगलातील ट्रेक. या घनदाट जंगलातून भटकताना त्यांच्या हाताशी होता तो फक्त चाकू. दिवसभराची पोटपूजा व्हायची ती सलाड नि मांसावर ताव मारून. तर रात्री जेवणासाठी असायचा पिर्हाना मासा. शहरात राहून येणारी टिपिकल शहरी साब/बाबूची इमेज अशा भटकंतीत पार उतरून जात असल्याचं ही दोघं आवर्जुन सांगतात.

जपानच्या भेटीबाबत ऍन आणि माईक म्हणतात, या भूतलावर जपानने स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक वेगळा ग्रहच म्हणा ना... तिथली संस्कृती असो वा तिथलं आदरातिथ्य तिथल्या प्रत्येक गोष्टीत डोकावणारी नम्रता तुम्हाला जाणवल्यावाचून राहणार नाही. या देशातल्या अनेक गोष्टी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. त्यातलीच एक म्हणजे, 300 पैंड वजनाच्या व्यक्तिलाही (सुमो) इथे सुपरमॉडल गर्लफ्रेंड मिळते. इंग्रजीचं फारसं ज्ञान नसलेली (अगदी इंग्रजीतल्या एका शब्दाचाच अर्थ माहित असलेली) व्यक्तीही तुम्हाला मदत करण्यास तत्पर असते. जपानमध्ये तुम्हाला सतरावेळा पादत्राणे बदलावी लागतात. म्हणजेच घरात प्रवेश करताना हाऊस शूज, स्वच्छतागृहात प्रवेश करताना बाथरूम शूज. इथली सर्वात उंच खुर्ची ही जमिनीपासून केवळ 8 इंच उंच.

त्यांच्या या अखंड प्रवासात त्यांना अनेक गोष्टींनी भुरळ पाडली. थायलंडची खाद्यसंस्कृती त्यांना आवडली तर इंडोनेशियामधील स्कूबा डायविंग. कंबोडियातल्या मंदिरांच्या रचनांनी त्यांना आकर्षित केलं तर नेपाळमधील उंचचउंच पर्वतरांगांनी त्यांचे पाय रोखून धरले. झाम्बियातलं वन्यजीवन तर जपानची संस्कृती त्यांना भावून गेली. म्यानमारच्या आदरातिथ्याने मात्र ते पुरते भारावून गेले. ओळख असो वा नसो इथली प्रत्येक व्यक्ति तुमचं स्वागत फ्लाईंग किस देऊनच करतं. त्याशिवाय तुम्हाला मिळते ते त्यांच्या घरी चहासाठी येण्याचं दिलं जाणारं आग्रहाचं निमंत्रण. इथल्या स्थानिकांनी काडीचाही मोबदला न घेता त्यांना त्यांचं गाव दाखवल्याचंही, माईक-ऍन सांगतात.

माईक आणि ऍनची ही सफर पुढेही सुरू राहणारच आहे. मालदीव्ज, जॉर्डन, इजिप्त, अंटार्क्टिका असा प्रवास करत ही दोघं  भारतातही येणार आहेत. त्यांच्या या अनलिमिटेड हनिमूनची अखेर कधी होईल तेव्हा होईल. पण ज्या दिवशी ते आपल्या घऱी परततील तेव्हा आयुष्यभराचं समाधान नक्कीच त्यांच्या गाठीशी असेल. माईक आणि ऍनानं केलेलं धाडस करणं कदाचित आपल्याला जमणार नाही. आपल्यातल्या अनेकांच्या आयुष्यातली ती वेळ टळून गेली असेल. पण मनात ठरवलं तर काहीही साध्य करता येतं, हे मात्र या जोडप्याच्या या धाडसाकडून शिकता येईलचं.  

000



v  तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण या दोघांना दिवसाला प्रत्येकी $37 (सरासरी) खर्च आला. त्यात विमानप्रवास, खाणंपिणं, राहणं, व्हिसा आणि इतर खर्चांचा समावेश आहे. जपान, आस्ट्रेलिया, नॅर्वेसारख्या महागड्या देशात मात्र हा खर्च $75 इतका होता. तिथेच कंबोडिया, बोलिविआ सारख्या देशात त्यांना $20 पेक्षाही कमी खर्च करावा लागला.

v  हॉरर चित्रपट पाहणार्यांना पिर्हाना माशाविषयी वेगळं असं सांगायला नको. पाण्यात आपलं बोट किंवा हात जातो न जातो तोच हा मासा आपल्यावर तुटून पडतो. अत्यंत विषारी मासा अशीच या माशाची ओळख. पण हा मासा चवीला एकदम झक्कास... मत्स्यप्रेमींनी एकदा तरी याची चव चाखावी असा.
v  जगातलं एकमेव स्वच्छ शहर म्हणजे जपान. जगातला सर्वात कमी कचरा कुंड्या असलेला देश. इथल्या टॉयलेट मध्येही तुम्हाला रिमोट कंट्रोल सापडेल. तोही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी. टीव्हीच्या रिमोट कंट्रोलला असणार्या बटणांपेक्षाही जास्त बटणं या रिमोटला आहेत. जशी, सिट वॉर्मरस, मल्टी डायरेक्शनल बिडे, बम ड्रायरस, पॉवरफुल डिओड्रंट स्प्रे, आटो सिट लिफ्टर, इत्यादी. बर्याच फूड स्टॉल्समध्ये कॅशिअरची जागा व्हेण्डिंग मशीन्सने घेतलेली दिसेल. याच मशीनद्वारे आर्डर आणि पैसेही घेतले जातात. शिवाय या देशात वाहतूकीचे नियमही अगदी काटेकोरपणे पाळले जातात. रात्री दहा वाजताही एखादा सायकलस्वार रस्त्यावर इतर कोणतेही वाहन नसताना दिला जाणारा डोन्ट वॉकचा सिग्नल ओलांडणार नाही.

v  जगातल्या सर्वात उंच दहा पर्वतांपैकी आठ पर्वत एकट्या नेपाळमध्ये आहेत. इथे स्वादिष्ट जेवण तुम्हाला केवळ 30 सेंटमध्ये मिळते. इथल्या शहरात फिरताना दर 15 मिनिटांनी तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसतील. हिंदुधर्माचं पालन इथे इतक्या काटेकोरपणे केले जाते की अगदी पाळीव प्राण्यांच्या कपाळाला देखील तुम्हाला टिळा लावलेला दिसेल.

v  तुम्हालाही माईक आणि ऍनची ही भटकंती अनुभवायची असेल तर तुम्ही त्यांच्या www.honetrek.com या ब्लॉगला भेट देऊ शकता. या ब्लगवर त्यांच्या प्रवासाची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. लक्झरी टॅव्हल, बजेट ट्रॅव्हल, ट्रिप कोच असे महागड्या आणि स्वस्त प्रवासाविषयीची माहितीही पाहता येईल. तसेच एखाद्या ठिकाणाबद्दल काही शंका, प्रश्न असतील तर तेही माईक आणि ऍनला विचारता येतील. फेसबुक व ट्वीटरवरही तुम्ही या दोघांना फॉलो करू शकता.


Ø  भारतात फिरताना जरा जपून...

दिल्लीतील दोन वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या घटनेने अवघ्या देशाला हादरा दिलाच पण या घटनेने भारताच्या अतिथीसंस्कृतीवरही एक न मिटणारा ओरखडा ओढला आहे. भारतात येणारा प्रत्येक पर्यटक स्वत:ला असुरक्षित समजतो. त्यामुळेच बरेचसे देश आपल्या नागरिकांना भारतात जाताना अनेक सावधगिरीच्या सूचना देतात. त्यात परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. मारेलीयान वार्ड नावाच्या एका पर्यटक महिलेनेही आपल्या ब्लॉगवरून भारतात जाणाऱ्या पर्यटकांसाठी सूचनांची जंत्रीच मांडली आहे.

1.       भारत हा खंडप्राय देश आहे. संस्कृती, धर्म, प्रथा, ठिकाणे यांच भारतइतके वैविध्य क्वचितच अन्य कुठल्या देशात दिसेल. पण त्यामुळेच तुमच्या वेशभूषेबद्दल सतर्क राहा. राजस्थानसारख्या पारंपरिक राज्यात टँक टॉप किंवा शॉर्टस अशा पोशाखात फिरणं तुमच्याकडे अनाहुतांच्या नजरा वळवायला कारणीभूत ठरेल. मुंबईतल्या कुलाबा किंवा बांद्रा भागात मात्र तुम्ही निर्धास्तपणे अशा पोशाखात वावरू शकता. मात्र शक्यतो भारतीय पोशाखातच फिरणे चांगले.

2.       भारतीय समाजात सभ्यता आणि परंपरेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे येथी लोकांना खटकेल असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी करू नका. अनोळखी लोकांशी मैत्री करू नका. रात्रीचं फिरताना तर अत्यंत सावध राहा.

3.       भारतातील अल्पशिक्षित लोकांशी बोलताना सतर्क राहा. उदा. रिक्षावाला, वेटर किंवा नोकर मंडळींशी जास्त सलगी करू नका. तुमच्या मोकळेपनाच त्या व्यक्तींकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

4.       प्रवास पूर्णपणे नियोजन करून करा. रात्रीअपरात्री तुमचे रेल्वेस्टेशनला उतरणे होणार नाही, अशाप्रकारे प्रवासाच्या वेळा ठरवा.

5.       कोठेही फिरताना  आपला मोबाईल, विसा आणि पासपोर्टची एखादी प्रत जवळ ठेवायला विसरू नका. तसेच सोशल नेटवर्किंग वा फोनच्या माध्यमातून आपल्या आप्तजनांच्या संपर्कात राहा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा